शिरपूर धुळे | दि. 04 मे 2026
धुळे जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड आज घडली असून, धुळे जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. विशाल आनंद यांनी सायंकाळी 6 वाजता अधिकृतपणे पदभार स्विकारताच संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा आता त्यांच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
यापूर्वीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. अखेर गृह विभागाच्या आदेशानुसार अमरावती ग्रामीण येथून बदली होऊन आलेल्या विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली.
अनुभव, शिक्षण आणि कडक कार्यपद्धती — धुळ्याला नवी ताकद!
2014 बॅचचे IPS अधिकारी असलेले विशाल आनंद हे महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत असून, त्यांनी नागपूर ग्रामीण व अमरावती ग्रामीण येथे प्रभावी नेतृत्व दिले आहे. त्यांनी Indian Institute of Technology Roorkee येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.
गुन्हेगारीवर लगाम बसणार का?
धुळे जिल्ह्यात वाढती चोरी, घरफोडी, अवैध धंदे आणि सायबर गुन्हे यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कडक आणि परिणामकारक कारवाईसाठी ओळख असलेले विशाल आनंद हे जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पदभार स्विकारताना वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या वेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, राजकुमार उपासे, तसेच विविध शाखांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेचा प्रश्न आता एकच — “नव्या SP चा धडाका कधी सुरू होणार?”
धुळेकरांच्या अपेक्षा उंचावल्या असून, येणाऱ्या काही दिवसांतच नव्या पोलीस अधीक्षकांची कार्यशैली स्पष्ट होणार आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















