शिरपूर- येथील शिरपूर तालुका पोलिस ठाणे हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेला लागून आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना उत आला आहे. दारूची अवैध विक्री, गुटखा तस्करी, जुगार/मटका अड्डे, वाळू माफिया आणि अवैध जमीन/खनिज उत्खनन हे प्रमुख अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. पोलीस कारवाई होऊनही हे धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले असून अनेक पोलिस कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून थांड मांडून बसले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. शेती अवजारे, विद्युत केबल, विद्युत मोटारींच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दारू, मटका असे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याची चर्चा सुरू आहे. गल्ली-बोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यातच बेकायदा सावकारीचे तालुक्याला ग्रहणच लागले आहे. हे सावकार मासिक 10 ते 15 टक्के आकारणी करून नागरिकांची लूट करत आहेत. यामुळे अनेकांनचे संसार उध्दवस्त होवू लागले आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे तेजीत असल्याचे चित्र आहे.
पैसे मिळविण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान
मटक्यात ओपन व क्लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्लोज आकड्यात लावले जातात. परंतु, क्लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. तसेच व्यसनाधीनता वाढते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे मटका बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहे. या सर्व बाबींकडे नुतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी यांनी जातीने लक्ष लावावे अशी मागणी सध्या करण्यात येत आहे

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















