शिरपूर : शिरपूरसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना कमीत कमी दरात प्रभावी व अत्याधुनिक उपचार मिळावेत असे आमच्या वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने प्रयत्न करुन अतिभव्य अशा 1200 बेडच्या हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहत आहेत, हे भूषणावह असून तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिलला एसव्हीकेएमच्या तपनभाई पटेल हॉस्पिटलसह विविध वास्तूंचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी 23 एप्रिलला सायंकाळी जनक व्हिला येथे हिरवळीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, लक्ष्मण पाटील, नरेंद्रसिंह सिसोदिया, कैलासचंद्र अग्रवाल, काशीनाथ माळी, दिलीप लोहार, रज्जाक कुरेशी, सुभाष कुलकर्णी, पिंटू शिरसाठ, अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, आमचे वडील कै.रसिकलाल पटेल यांनी सामान्य माणसाच्या आरोग्याविषयी नेहमीच कळकळ व्यक्त केली. त्यांची स्वप्नपूर्ती म्हणून हे हॉस्पिटल उभारले असून ते शिरपूरचे आरोग्य वैभव ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
भूपेशभाई म्हणाले की, ज्यावेळी तालुक्याच्या विकासकामांसाठी मदतीचे आवाहन केले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतनिधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शिरपुरात विविध विकासकामे उभारणे शक्य झाले.
बबनराव चौधरी व सुभाष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल माहिती दिली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















