शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील गधडदेव ग्रामपंचायत हद्दीत बनावट देशीदारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत तब्बल रु. ७ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा. राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे, संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्रीमती यु. आर. वर्मा, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग तसेच मा. श्रीमती स्वाती काकडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, आंबाडूकपाडा शिवार परिसरातील एका कुडाच्या झोपडीत बनावट देशीदारू तयार केली जात आहे. माहितीची खातरजमा करून पथकाने दोन पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.या धडक कारवाईत ९० मिलीच्या ५१०० सीलबंद बनावट देशीदारू बाटल्या, १०० लिटर तयार बनावट दारू, ५०० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट), १८ हजार रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक टाक्या, दारू निर्मितीचे साहित्य तसेच स्विफ्ट डिझायर कार (क्र. GJ05-CL-5480) असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अजयसिंग उजयसिंग उखळदे (वय २६) मनोहर हिरालाल पिंपळदे (वय २४) मोगा शिवाजी मुसळदे (वय २७) रा. सुलतानपूर, ता. शहादा, जि. नंदुरबारयांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई निरीक्षक देविदास नेहूल यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संतोष निकम, एम. डी. पाटील, जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, केतन जाधव, हेमंत पाटील, एम. पी. म्हस्के, वाहन चालक रविंद्र देसले व निलेश मोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















