धुळे : लग्नासाठी मुलगा–मुलगी जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणांना फसवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एजंट सचिन मरगडे याच्यासह तीन महिलांना पोलिसांनी अटक केली असून प्राथमिक चौकशीत त्यांनी अनेक तरुणांना फसवणुकीची कबुली दिली आहे.
घटनेचा तपशील
शहरातील ३५ वर्षीय तरुण विवाहासाठी स्थळ शोधत होता. यावेळी त्याला एजंट सचिन मरगडे याचा संपर्क क्रमांक मिळाला. मरगडे याने त्याची ओळख “काजल” नावाच्या मुलीशी करून दिली. त्यानंतर १ लाख ३० हजार रुपये घेऊन दोघांचे लग्न लावण्यात आले.
मात्र लग्नानंतर काही दिवसांतच नवरीच्या वागण्यात संशयास्पद बाबी आढळल्या. चौकशी केल्यानंतर ती आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. या घटनेने तरुणाला धक्का बसला.
हुशारीने रचला सापळा
पीडित तरुणाने धैर्य दाखवत एजंटला पुन्हा संपर्क केला. यावेळी मित्रासाठी स्थळ हवे असल्याचे भासवून तो पुन्हा मरगडेच्या संपर्कात आला. एजंट दुसरी मुलगी घेऊन आल्यावर चाळीसगाव रोड पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून मरगडे, बनावट नवरी काजल आणि तिच्या दोन साथीदार महिलांना ताब्यात घेतले.
पोलिसांची कारवाई
चौकशीदरम्यान आरोपींनी नागपूर व इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.




















