धुळे : यंदाच्या गणेशोत्सवात धुळ्यातील गणेश मंडळांना डीजे व लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. गणेशोत्सवात होणारा ध्वनिप्रदूषण व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी डीजे व लेझर लाईटच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत.
डीजे व लेझर लाईटवर कडक बंदी
गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून दहा दिवस विविध ठिकाणी गणेश मंडळांकडून भव्य स्वागत मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये तसेच गणेशोत्सवाच्या काळात डीजे व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या गोंगाटामुळे वीजेच्या तडाख्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तसेच मोठ्या संख्येने होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकांदरम्यान रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवांना अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मंडळांना देण्यात आले आहेत.
नागरिकांना व मंडळांना आवाहन
पोलीस अधीक्षक धीवरे यांनी मंडळांना आवाहन केले आहे की,
कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे देखावे, बॅनर किंवा पोस्टर्स लावू नयेत.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे देखावे सादर करू नयेत.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर पोस्ट्स प्रसारित करू नयेत.
पारंपरिक आणि सुरक्षिततेला प्राधान्य
या आदेशामुळे यंदाचा गणेशोत्सव धुळ्यात पारंपरिक पद्धतीने, पण आवाजविरहित व सुरक्षिततेला प्राधान्य देत साजरा होणार आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून नागरिक व मंडळांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















