शिरपूर : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धाडसी कारवाई करत बसमधील प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी चोरणाऱ्या इसमाला शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ₹७०,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पीडितेला दिलासा दिला आहे.
प्रकार असा घडला
फिर्यादी बंदनाचाई सोनगीरे (वय ६१, रा. शिरपूर) या आपल्या नातीसह शिरपूर बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांचा वेगवान तपास
तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. बसस्थानक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदर आरोपीचे नाव शुभम वणगध सूर्यवंशी (वय २७, रा. अंबरनाथ, जि. ठाणे) असे असून, तो पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.
मुद्देमाल हस्तगत
आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची बांगडी पोलिसांनी जप्त केली असून तिची किंमत सुमारे ₹७०,००० एवढी आहे. यामुळे फिर्यादी महिलेला दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांत पोलिसांविषयी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिन्न गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पो.नि. किशोरकुमार परदेशी तसेच गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोका. विनोद आखडमल, भटू साळुंके, मनोज दाभाडे, योगेश दाभाडे, सचिन वाघ, सोमा ठाकरे, गाविंद कोळी, आरिफ तडवी, प्रशांत पवार, मनोज महाजन, प्रशांत बाविस्कर व उमेश पवार यांनी मोलाची भूमिका बजावली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
शिरपूर पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच कुठलाही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















